प्रेमसंबंधातून थरारक हत्याकांड! थेरगावमध्ये १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; पोलिसांकडून ८ तासांत आरोपी अटक
साईमत / पुणे
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात तरुणाचा भाऊही गंभीर जखमी झाला असून, काळेवाडी पोलिसांनी अवघ्या ८ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
ही घटना थेरगाव येथील शिवशंकर कॉलनीतील श्रीकृष्ण दूध डेरीसमोर घडली. सुभान शेख (वय १९) या तरुणावर चाकू आणि चॉपरने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याचा भाऊ अर्शद शेख गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजता सुभान आणि त्याचा भाऊ परिसरातून जात असताना आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी त्यांना अडवले. सुभानचे सपना नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.
वाद चिघळल्यानंतर आरोपींनी चाकू, चॉपर आणि लाकडी दांडक्याने सुभानवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुभानचा जागीच मृत्यू झाला, तर अर्शद गंभीर जखमी झाला.
पोलिस तपासात या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशीचे जयश्री नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. तर मृत सुभानचे जयश्री यांच्या मुलगी सपनासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या संबंधांवरून वाद निर्माण होऊन घटनेचे रूपांतर हत्येत झाले, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
काळेवाडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन्ही आरोपींना ८ तासांत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
