२२ तास मृत बाळ गर्भात ठेवल्याचा आरोप; डॉक्टरांच्या हलगर्जीवर चौकशी समिती नेमली
साईमत / परळी
परळीतील एका खाजगी रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित महिलेवर सुरुवातीपासूनच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
महिलेच्या पती वैजनाथ मुंडे यांनी आरोप केला आहे की, चुकीच्या उपचारामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत बाळ सुमारे 22 तास गर्भातच ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिलेवर परळीतील डॉ. कल्पना गित्ते यांच्या खाजगी रुग्णालयात सुमारे आठ ते साडेआठ महिन्यांपासून उपचार सुरू होते. प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतरही डॉक्टरांनी योग्य माहिती न देता उपचार सुरू ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे. बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्यानंतरही रुग्णालयाने योग्य निर्णय न घेतल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे केवळ बाळाचा मृत्यूच झाला नाही, तर मातेलाही गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि परळी शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार साळुंके यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
