साईमत / नवी दिल्ली
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारताविरोधात भडकावू आणि वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला उद्देशून युद्धासाठी सज्ज असल्याचा इशारा दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या ‘मरका-ए-हक’ या कार्यक्रमात बोलताना ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, गेल्या वर्षी पहलगाम घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर संशय घेत हल्ला केला होता. भविष्यात पुन्हा असे प्रकार घडल्यास पाकिस्तानकडून “अधिक जोरदार आणि निर्णायक प्रत्युत्तर” दिले जाईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात त्यांनी भारताला उद्देशून आक्रमक भाषा वापरत पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून ‘मरका-ए-हक’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात पाकिस्तान सैन्याच्या कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच पाकिस्तान आता स्थिर आणि शक्तिशाली देश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पुस्तिकेत भारताकडून करण्यात आलेल्या कथित कारवायांचा उल्लेख करत पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच भारतासोबतच्या कोणत्याही परिस्थितीसाठी पाकिस्तान तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर 1971 च्या युद्धाचा उल्लेख करत भारताकडून पाकिस्तानला मोठा पराभव स्वीकारावा लागल्याची ऐतिहासिक आठवणही अधोरेखित केली जात आहे. तसेच अलीकडील ऑपरेशन्समध्ये भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचेही नमूद केले जात आहे.
एकूणच पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या विधानामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
