काकीनाडा–हिसार एक्स्प्रेस कायमस्वरूपी, खानदेशाला मोठा दिलासा
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
राजस्थानमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळे श्री खाटू श्याम मंदिर आणि अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काकीनाडा टाऊन–हिसार विशेष एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी नियमित गाडी म्हणून चालवण्यास मंजुरी देण्यात आली असून, यामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आतापर्यंत भुसावळ, जळगाव, धरणगाव आणि अमळनेर परिसरातील प्रवाशांना या धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी वाहतुकीचा खर्चिक पर्याय किंवा अनेक गाड्यांचे बदल करत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत होता. मात्र आता थेट रेल्वे जोडणी उपलब्ध झाल्याने हा प्रवास अधिक सोपा आणि परवडणारा होणार आहे.
सध्या 07717/07718 क्रमांकाने धावणारी काकीनाडा टाऊन–हिसार विशेष साप्ताहिक गाडी आता नियमित एक्स्प्रेस सेवेत रूपांतरित करण्यात आली आहे. या नव्या व्यवस्थेनुसार गाडी क्रमांक 17295 काकीनाडा टाऊन–हिसार एक्स्प्रेस 12 मेपासून सुरू होणार असून, 17296 हिसार–काकीनाडा टाऊन एक्स्प्रेस 15 मेपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
वेळापत्रकानुसार, 17295 ही गाडी दर मंगळवारी काकीनाडा टाऊन येथून सकाळी 5.40 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10.20 वाजता हिसार येथे पोहोचेल. तर 17296 ही गाडी दर शुक्रवारी हिसार येथून दुपारी 2.10 वाजता रवाना होऊन तिसऱ्या दिवशी रात्री 9.35 वाजता काकीनाडा टाऊन येथे पोहोचेल.
या दोन्ही गाड्यांना भुसावळ, जळगाव, धरणगाव आणि अमळनेर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातील प्रवाशांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून, भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.
