साईमत/ नाशिक
नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील गंगासागर नगरमध्ये सोमवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ३६ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी महिलेचे नाव सोनाली रवींद्र साळवे (वय 36) असे आहे. त्या नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत असताना अचानक गॅसगळती झाली आणि त्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
स्फोट इतका तीव्र होता की काही क्षणांतच घरातील कपडे, फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. मोठ्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली.
माहिती मिळताच सातपूर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घराच्या किचन आणि हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती. जवानांनी प्रसंगावधान राखत घरात प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवले. घरात असलेले इतर गॅस सिलिंडर बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
प्राथमिक तपासात गॅसगळतीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी गॅस वापरताना योग्य काळजी घ्यावी, रेग्युलेटर व पाइपची नियमित तपासणी करावी, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.
