महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन; ४०० घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंटचा निर्णय
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
शहरातील वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाधारित उपायांना चालना देण्यासाठी “कूल रूफ सोल्युशन” या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी समता नगर (प्रभाग क्र. १२) येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे पत्र्याच्या घरांतील तापमानात तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे प्रत्यक्ष निरीक्षणातून समोर आले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, उपायुक्त धनश्री शिंदे, उपआयुक्त पंकज गोसावी तसेच नगरसेवक नितीन बरडे, उज्वला बेंडाळे आणि गायत्री राणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंटमुळे घरांना मिळतोय गारवा
“महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्गाधारित उपाय” या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात पत्र्याच्या घरांवर विशेष सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा (Solar Reflective Paint) डबल कोट दिला जात आहे. सूर्यकिरणांचे परावर्तन करून घरांतील उष्णता कमी करण्याची ही तंत्रज्ञान आधारित पद्धत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
हा प्रकल्प ऑल इंडिया डिझास्टर मिटिगेशन इन्स्टिट्यूट (AIDMI), अहमदाबाद, प्रॅक्टिकल अॅक्शन, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि जळगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.
प्रत्यक्ष तपासणीत १० अंशांचा फरक
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी प्रत्यक्ष रंग केलेल्या आणि न केलेल्या घरांतील तापमान मोजले. त्यावेळी रंग केलेल्या घरांमध्ये वातावरण लक्षणीयरीत्या थंड असल्याचे दिसून आले. दोन्ही प्रकारच्या घरांतील तापमानात सुमारे १० अंश सेल्सिअसचा फरक नोंदविण्यात आला.
महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः काही घरांमध्ये जाऊन तापमान मोजणी केली आणि या उपक्रमाच्या परिणामकारकतेचे कौतुक केले.
४०० घरांपर्यंत विस्ताराचा निर्णय
या प्रकल्पाचा पुढील टप्पा म्हणून शहरातील विविध भागांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. समतानगर, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी आणि पिंप्राळा हुडको परिसरातील प्रत्येकी १०० पत्र्याची व ३०० चौरस फूटांपेक्षा कमी क्षेत्रफळाची काँक्रीट घरे मिळून एकूण ४०० घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह पेंट करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे शहरातील उष्णतेचा त्रास कमी होण्यासोबतच ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
