पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या दुहेरी औचित्य साधत जळगावात शिवसेनेतर्फे कष्टकरी कामगारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे जितेंद्र गवळी यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाने श्रमिकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
शहरातील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात १ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कामगारांचा विशेष गौरव करण्यात आला. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता समाजव्यवस्थेचा कणा म्हणून कार्य करणाऱ्या श्रमिकांना यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.
उपस्थित कामगारांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे आणि त्यांच्या योगदानाची जाणीव समाजाला करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. “कामगार हा केवळ अर्थव्यवस्थेचा घटक नसून समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या कष्टांची कदर करणे ही आपली जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमामुळे श्रमाचे महत्त्व अधोरेखित होत असून, सामान्य कष्टकऱ्यांमध्ये आपल्या कार्याबद्दल अभिमानाची भावना निर्माण होत आहे. जळगावमधील हा सन्मान सोहळा सामाजिक एकोपा आणि कृतज्ञतेचे प्रतीक ठरला आहे.
कार्यक्रमास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी, राजेंद्र सपकाळे, सागर गवळी, दीपक पाटील, शुभम गवळी, चेतन परदेशी, विजय भाटी, सोनू तायडे, अमोल जगताप, विशाल निकम यांसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
