जुन्या वादातून घारीवलीत हिंसाचार; अल्पवयीनासह चौघे ताब्यात, परिसरात तणाव
साईमत / डोंबिवली
शहरालगतच्या घारीवली परिसरात जुन्या वादातून उफाळलेल्या हिंसाचारात एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. दहा ते पंधरा जणांच्या जमावाने तरुणाला घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केली. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव, त्यांचे वडील बामा जाधव आणि भाऊ दिनेश जाधव हे घारीवली येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री कुटुंब जेवण करत असताना काही जणांनी दिनेश याला बाहेर बोलावले. तो बाहेर येताच आधीपासून दबा धरून बसलेल्या १० ते १२ जणांच्या जमावाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवत मारहाण सुरू केली.
दिनेशला वाचवण्यासाठी राहुल व त्यांचे वडील बामा जाधव बाहेर धावून आले. मात्र, जमावाने त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बामा जाधव गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पवयीनासह चार जणांना ताब्यात घेतले असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेवर राजकीय पडसाद उमटू लागले असून वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध नोंदवला आहे. फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे घारीवली परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे.
