साईमत / जळगाव
शहरातील तांबापुरा भागातील मच्छी बाजार परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक युसूफ मुसा खाटीक (वय ६५) हे २६ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजता पत्नी सलमा बी यांच्यासोबत घराबाहेर पाणी भरत होते. याच वेळी आरोपी मोहम्मद शेख मेहमूद तेथे आला आणि त्याने दारूसाठी ५०० रुपयांची मागणी केली.
सलमा बी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला आणि जवळच पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यानंतर आरोपीने युसूफ खाटीक यांच्या खिशातून ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि तेथून पळ काढला.
जखमी सलमा बी यांना तातडीने ‘सारा हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, २७ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपीचा पिता मेहमूद शेख मेहबूब याने हॉस्पिटल परिसरात जाऊन माफी मागण्याऐवजी युसूफ खाटीक यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी युसूफ खाटीक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी पिता-पुत्राविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अशोक कोळे पुढील तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
