एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेटकडून गंभीर इशारा; सरकारकडे करकपात व मदतीची मागणी
साईमत \ नवी दिल्ली
देशातील विमान वाहतूक क्षेत्र सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असल्याचे चित्र समोर आले आहे. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइसजेट यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी विमान इंधन (ATF) दरातील वाढ आणि जास्त करभारामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे स्पष्ट केले आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्स या संघटनेने केंद्र सरकारला निवेदन देत परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. इंधन दरात कपात किंवा आर्थिक मदत न मिळाल्यास काही कंपन्यांना आपले कामकाज बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी जवळपास ४० ते ४५ टक्के खर्च इंधनावर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे ATF दरही उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यातच भारतात केंद्र व राज्य सरकारांकडून आकारला जाणारा VAT आणि एक्साईज ड्युटीचा भार इतर देशांच्या तुलनेत अधिक असल्याने कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
या पार्श्वभूमीवर एअरलाईन कंपन्यांनी एटीएफला जीएसटी अंतर्गत आणावे, लँडिंग व पार्किंग शुल्कात तात्पुरती सवलत द्यावी तसेच उद्योगाला स्थिर करण्यासाठी विशेष आर्थिक मदत व कर्ज सवलती द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या परिस्थितीचा थेट परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता असून, येत्या काळात विमान तिकिटांच्या दरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
