ओडिशात धक्कादायक प्रकार; बँकेच्या नियमांमुळे हतबल झालेल्या भावाची संतापजनक कृती
साईमत / ओडिशा
बँकेच्या कठोर नियमांमुळे आणि कागदपत्रांच्या अडचणीमुळे माणुसकीला काळी छाया पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी एका भावाला तिचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जाण्याची वेळ आली.
ही घटना ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालिपोसी शाखेत घडली. दियानाली गावातील जितू मुंडा (५०) हा व्यक्ती आपल्या मृत बहिणी कालरा मुंडा (५६) हिच्या खात्यातील २० हजार रुपये काढण्यासाठी बँकेत गेला होता. कालरा मुंडा यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले होते.
जितू मुंडा यांनी बँकेत अनेकदा चकरा मारल्या, मात्र प्रत्येक वेळी खातेदाराला स्वतः हजर राहण्याची मागणी करण्यात आली. बहिणीचे निधन झाल्याचे सांगूनही बँक अधिकाऱ्यांनी मृत्यू प्रमाणपत्र व वारसा हक्काची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र आदिवासी पार्श्वभूमीमुळे ही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्याने सांगितले.
वारंवार प्रयत्न करूनही पैसे मिळत नसल्याने हतबल झालेल्या जितूने अखेर टोकाचा निर्णय घेतला. तो आपल्या बहिणीचा सांगाडा घेऊन थेट बँकेत पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितू मुंडा याला बँकेच्या नियमांची पुरेशी माहिती नसल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. ही घटना बँकिंग व्यवस्थेतील कागदपत्र प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.
