उष्णतेची लाट तीव्र; दिवस-रात्र उकाड्याने नागरिक हैराण, पुढील काही दिवसही दिलासा नाही
साईमत / जळगाव
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या सूर्य अक्षरशः आग ओकत असून उष्णतेच्या तीव्रतेने यंदाच्या हंगामातील सर्व विक्रम मोडले आहेत. रविवारी (दि. २६ एप्रिल) जळगावचे कमाल तापमान तब्बल ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे या हंगामातील सर्वोच्च नोंद ठरले आहे.
गेल्या पंधरवड्यापासून ४१ ते ४२ अंशांदरम्यान असलेला पारा आता झपाट्याने वाढत ४४ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जळगावकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून अंगाची लाहीलाही होत आहे.
उष्णतेचा परिणाम केवळ दिवसा नव्हे, तर रात्रीही जाणवत आहे. रात्रीचे तापमानही २८ अंशांपर्यंत पोहोचल्याने घरामध्ये कूलर, पंखे असूनही फारसा दिलासा मिळत नाही. उष्ण वाऱ्यांमुळे आणि जमिनीत साठलेल्या तापमानामुळे रात्रीही वातावरण तापलेलेच राहत आहे.
गेल्या तीन दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. २४ एप्रिल रोजी ४२ अंश, २५ एप्रिल रोजी ४३ अंश आणि २६ एप्रिल रोजी ४४ अंश अशी सलग वाढ नोंदवली गेली. रविवारी सुटीचा दिवस असूनही उष्णतेच्या तीव्रतेमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. दुपारच्या वेळी जणू अघोषित लॉकडाऊन असल्याचे चित्र होते.
दुपारी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असतानाही उकाडा कमी झाला नाही. रात्री ८ वाजेपर्यंतही उष्णतेच्या झळा कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तापमान ४२ ते ४५ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुढील पाच दिवसांचा अंदाज : २७ एप्रिल : ४४°C, २८ एप्रिल : ४३°C, २९ एप्रिल : ४३°C, ३० एप्रिल : ४४°C, १ मे : ४३°C, उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
