दरखेडा येथे समोरासमोर धडक; स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल
साईमत / धुळे
शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा परिसरात भीषण अपघात घडून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिमठाणे गावाजवळील दरखेडा येथे हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. मृत्यूमुखी पडलेले दोघेही तरुण दुचाकीवर प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी झालेल्या चार जणांना स्थानिकांच्या मदतीने त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते अपघातांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात : दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरही अपघाताची घटना घडली. कारंजा तालुक्यातील चॅनल क्रमांक १६७ येथे आलिशान कारचा पुढील टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळून उलटली.
या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दोन्ही घटनांमुळे राज्यातील रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
