माहेरी राहणाऱ्या पत्नीवर रात्री छतावरून घरात शिरून चाकूहल्ला; सासरे व ३ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी, आरोपी फरार
साईमत / उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील नगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बछईपुर गावात एक अत्यंत धक्कादायक दुहेरी हत्याकांड घडले आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच आपल्या पत्नी आणि सासूची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतू गुप्ता (वय ५५) यांनी आपली मुलगी प्रीती (वय २२) हिचा विवाह काही वर्षांपूर्वी गढवार भागातील अमित गुप्ता याच्याशी केला होता. मात्र, वैवाहिक जीवनात सतत वाद होत असल्याने प्रीती गेल्या काही महिन्यांपासून आपल्या तीन वर्षांच्या मुलासह माहेरी राहत होती.
घटनेच्या रात्री आरोपी अमित गुप्ता शेजाऱ्याच्या भिंतीचा आधार घेत छतावरून घरात शिरला. त्याने घरात घुसून पत्नी प्रीती, सासू सुशीला (वय ५०), सासरे अंतू गुप्ता तसेच आपल्या तीन वर्षांच्या मुलावरही चाकूने सपासप वार केले.
या हल्ल्यात प्रीती आणि सुशीला यांचा जागीच मृत्यू झाला. तर सासरे अंतू गुप्ता आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सासऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाराणसीला हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक टीम, SWAT पथक आणि सर्व्हिलन्स युनिट तपासासाठी दाखल झाले आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे.
आरोपी अमित गुप्ता फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
