व्हाइट हाऊसजवळील हिल्टन हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर ट्रम्प, मेलानिया आणि जेडी वेन्स सुरक्षित स्थळी हलवले; हल्लेखोर ताब्यात
साईमत / वृत्तसंस्था
अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसरी बैठक अयशस्वी ठरल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉशिंग्टन डीसीतील व्हाइट हाऊसजवळील हिल्टन हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.
या वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हे पत्रकारांसोबत डिनर पार्टीत सहभागी होते. अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू येताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली.
सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष वेन्स यांना सुरक्षितपणे हॉटेलमधून बाहेर काढत व्हाइट हाऊसमध्ये हलवले. याचवेळी हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर देत ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेदरम्यान हॉटेलमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. सुमारे २६०० लोकांनी जीव वाचवण्यासाठी विविध ठिकाणी लपून आश्रय घेतला. पत्रकार टेबलाखाली लपले, तर वेटर आणि कर्मचारी डायनिंग हॉलमध्ये लपले असल्याचे समजते.
घटनेनंतर संपूर्ण हॉटेल परिसर रिकामा करून सील करण्यात आला असून, आसपासच्या भागात कडक नाकेबंदी लावण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे आणि हल्लेखोरांच्या हेतूचा शोध घेतला जात आहे.
सध्या डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स पूर्णपणे सुरक्षित असून, या प्रकरणाचा तपास अमेरिकन सुरक्षा यंत्रणांकडून वेगाने सुरू आहे.
