धुके, पाऊस आणि अंधारात बचावकार्याला अडथळे; अनेक तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर
साईमत / सातारा
तालुक्यातील आंबेनळी घाट येथे अत्यंत दुर्दैवी अपघात घडून एका दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुमारे ९०० फूट खोल दरीत मोटारसायकलसह कोसळल्याने हा अपघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळून आल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र, मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
बचाव पथकाने दोरांच्या सहाय्याने खोल दरीत उतरून शोधकार्य सुरू ठेवले. प्रतिकूल हवामानामुळे रात्री उशिरा काही काळ मोहीम थांबवावी लागली. आज सकाळी पुन्हा पोलीस, बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तरित्या शोधकार्य हाती घेतले.
अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे ९०० फूट खोल दरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आणखी सुमारे १५० फूट खाली महिलेचा मृतदेह सापडला. या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी झाली आहे.
या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बचावकार्य पार पाडणाऱ्या पथकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर घाट रस्त्यांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, विशेषतः पावसाळ्यात आणि धुक्याच्या वातावरणात वाहन चालवताना अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
