साईमत / गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका 21 वर्षीय तरुणाने गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी सुमित ऊईके हे एकाच गावातील असून त्यांची मागील दोन वर्षांपासून ओळख होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. त्यानंतरही तो सतत तिचा छळ करत होता.
घटनेच्या दिवशी आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेले. तिथे त्याने “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला ठार मारीन,” अशी धमकी देत दबाव टाकला. मुलीने ठाम नकार दिल्यानंतर आरोपीने अमानुष कृत्य करत तिचे हात-पाय आणि तोंड ओढणीने बांधून तिला खोलीत बंद करून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी शाळा उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मुलगी बांधलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी तात्काळ तिची सुटका करून पोलिसांना माहिती दिली.
या घटनेनंतर संपूर्ण तिरोडा तालुक्यात संतापाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सुमित ऊईके याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी घटनेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
