जळगाव सराफ बाजारात सोनं १२०० रुपयांनी तर चांदी ५००० रुपयांनी स्वस्त; तरीही दर उच्च पातळीवर कायम
साईमत / जळगाव
रोजच्या घडामोडीनुसार सोने-चांदीचे नवीन दर जाहीर होत असून जळगावच्या सराफ बाजारात या मौल्यवान धातूंना चांगली मागणी कायम आहे. आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घट झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली येताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दर घसरणीच्या दिशेने वळल्याने बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असून दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला ताण येत आहे. मे महिन्यात अनेक शुभमुहूर्त असल्यामुळे सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आजचे सोन्या-चांदीचे दर: आज जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे १२०० रुपयांची घसरण झाली असून एसटीसह दर १ लाख ५५ हजार ५३० रुपये इतका आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ५००० रुपयांची घट होऊन दर प्रति किलो २ लाख ५५ हजार ४४० रुपये झाला आहे.
दर कमी होत असले तरी सोन्याचे भाव अजूनही उच्च पातळीवर असल्याने सामान्य ग्राहकांसाठी खरेदी अद्यापही आव्हानात्मक ठरत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव सोन्याच्या दरावर सतत दिसून येत असून पूर्वीच्या घसरणीनंतर पुन्हा वाढ झाल्याचेही बाजारात पाहायला मिळाले होते. त्यामुळे पुढील काळात सोन्याचे दर कोणत्या दिशेने जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
