पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; संशयित तंजीर इनामदारला अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी
साईमत / नाशिक
नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पीडित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मोबाईलमध्ये जबरदस्तीने फोटो काढणे, त्या फोटोंच्या आधारे धमकावून लैंगिक अत्याचार करणे तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकणे असे गंभीर आरोप एका व्यक्तीवर करण्यात आले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तंजीर इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तंजीर हा जून २०२४ पासून जानेवारी २०२६ पर्यंत वारंवार तिच्यावर मानसिक आणि शारीरिक दबाव टाकत होता. तिच्या इच्छेविरुद्ध तिचे मोबाईलमध्ये फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आहे.
जानेवारी २०२६ मध्ये आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला एका लॉजमध्ये नेले. तेथे त्याने जबरदस्तीने मद्य सेवन करायला लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. यासोबतच तिच्या गळ्यातील तुळशी माळ आणि हातातील धार्मिक धागे काढण्यास भाग पाडून तिच्या धार्मिक भावना दुखावण्याचा तसेच धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
