रानमेवा गोळा करण्यासाठी गेलेल्या कृष्णा आगीवलेवर झडप; वनविभागाच्या दुर्लक्षाचा आरोप, परिसरात भीतीचे वातावरण
साईमत / कसारा
डोळखांब वनपरिक्षेत्रातील कळभोंडे लाद्याची वाडी येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णा भागा आगीवले असे मृत बालकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास कृष्णा हा गावालगतच्या जंगलात रानमेवा गोळा करण्यासाठी गेला होता. झाडावरील आंबे व करवंदे तोडत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात कृष्णा गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता बिबट्याच्या वावराची भीती अधिकच तीव्र झाली. परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती, मात्र ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याने अखेर हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वनमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी न झाल्याचा आरोपही स्थानिक पातळीवर होत आहे.
दरम्यान, घटनेनंतर ग्रामस्थांनी परिसरात तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुर्दैवी बाब म्हणजे कृष्णा याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्याच्या वडिलांचे छत्र हरपले आहे. आई रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याने या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वन्यजीव-मानव संघर्षावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
