जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी, किनारी भागात भीतीचे वातावरण
साईमत / टोकियो वृत्तसंस्था
उत्तर जपानमध्ये आज 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या भूकंपानंतर जपानच्या हवामान संस्थेने (JMA) तात्काळ त्सुनामीचा इशारा जारी केला असून किनारी भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान संस्थेच्या माहितीनुसार, या भूकंपानंतर 3 मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5.32 वाजता 70 सेंटीमीटर उंचीची पहिली लाट किनार्यावर धडकली.
इवाते प्रांतातील कुजी बंदरात 5.34 वाजता आणखी एक त्सुनामी लाट नोंदवण्यात आली. त्यापूर्वी 40 सेंटीमीटर उंचीची छोटी लाटही किनाऱ्यावर धडकल्याची माहिती मिळाली आहे. ओमोरी आणि आग्नेय होक्काइडो परिसरातही त्सुनामीचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.
भूकंपानंतर ईशान्य जपानमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि मोठ्या धक्क्यांसाठी तयार राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे किनारी भागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून बचाव पथके सतर्क करण्यात आली आहेत.
दरम्यान, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून पुढील धक्क्यांची शक्यता नाकारता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
