तांत्रिक बिघाडामुळे प्लॅटफॉर्म गोंधळ; मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, मध्य रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत
साईमत / मुंबई
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकात आज दुपारी मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना घडली आहे. दुपारी सुमारे ३:१५ ते ३:२० च्या दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन लोकल गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ कडे वळवण्यात आली. त्याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आधीच एक लोकल उभी होती. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याचे लक्षात येताच मोटरमनने तात्काळ प्रसंगावधान राखत ब्रेक लावले आणि संभाव्य भीषण अपघात टळला.
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ दरम्यानची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. संबंधित लोकल मागे घेऊन सुरक्षित करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे CSMT आणि इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. काही गाड्या उशिराने धावल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला की मानवी त्रुटी, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
