शहापूरमध्ये बिबट्याचा भीषण हल्ला; ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाच्या उशिरामुळे संतापाची लाट
साईमत / शहापूर
शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मृत मुलाचे नाव कृष्णा भागवत अगीवले असे असून तो नेहमीप्रमाणे मित्रांसोबत आंबे तोडण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. मे महिन्याच्या सुट्टीमुळे परिसरातील मुले सकाळी शाळेनंतर आंबे गोळा करण्यासाठी जंगलात जात होती.
परंतु या वेळी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कृष्णावर हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने फरफटत नेले. काही क्षणांतच घडलेल्या या प्रकारामुळे इतर मुले घाबरून गावाकडे धावली.
गावकऱ्यांनी तातडीने जंगल परिसरात धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र तोपर्यंत कृष्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळेत घटनास्थळी न पोहोचल्याने मृतदेह जंगलातच पडून राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे संताप आणखी वाढला असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कृष्णाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून आईने हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केला आहे. संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
या घटनेनंतर परिसरात मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बिबट्यांचा वाढता वावर आणि वनविभागाची उदासीनता यावर कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे.
