साईमत / जळगाव
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सोन्याच्या सातत्याने वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा दीड लाख रुपयांच्या पुढे पोहोचल्याने खरेदीदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक सध्या खरेदी टाळून बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असले तरी आज मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही. दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी उच्च किमतीमुळे खरेदीवर मर्यादा येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, चांदीच्या दरात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल १० हजार रुपयांची घट झाली असून सध्या दर प्रति किलो २,६५,००० रुपयांवर आला आहे. या घसरणीमुळे लग्नसराईसाठी चांदीची भांडी किंवा दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत असून बाजारात चांदी खरेदीला पुन्हा गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
