सुदैवाने जीवितहानी टळली, आकाशवाणी चौकात क्षणभर तणाव
साईमत जळगाव प्रतिनिधी :
शहरातील अत्यंत गजबजलेल्या आकाशवाणी चौकात मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास आकाशवाणी चौकातून वेगाने जात असलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला अचानक जोराची धडक दिली. धडकेचा आवाज आणि तीव्रता इतकी मोठी होती की परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर ट्रक चालक आणि कार चालक यांच्यात रस्त्याच्या मधोमधच शाब्दिक वाद झाला. त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही चालकांना समज देत परिस्थिती नियंत्रणात आणली. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दोन्ही अपघातग्रस्त वाहने तातडीने रस्त्याच्या कडेला हटवण्यात आली.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. दरम्यान, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोन्ही वाहनधारकांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
