जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन; २४ तासांत अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
साईमत जळगाव प्रतिनिधी :
शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली असून, सोमवार, २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, दि. ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता रिंगरोड परिसरात मुकुंद सपकाळे हे त्यांच्या वाहनाने जात असताना ५ ते ६ मोटारसायकलस्वारांनी त्यांचे वाहन अडवले. आरोपींनी वाहनाला चारही बाजूंनी घेराव घालून दगडफेक करत वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या हल्ल्यात स्कॉर्पिओ वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सपकाळे यांचा जीव धोक्यात आला होता.
या प्रकरणात विशाल राजू अहिरे याचे नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे आले असून त्याच्यासह इतर साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतरही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने नागरिक व सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित आरोपींवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या हल्ल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलन, व्याख्याने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवर परिणाम झाला असून काही कार्यक्रम रद्द करावे लागले. त्यामुळे शहरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक संघटनांनी या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच २४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करून स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात संभाव्य गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना मुकुंद सपकाळे, वासंती दिघे, वैशाली झाल्टे, अजय पाटील, प्रा. प्रीतिलाल पवार (वंचित आघाडी), अॅड. आनंद कोचुरे, संजय सपकाळे, वाल्मिक जाधव (भीमसेना जिल्हाध्यक्ष), मोनू अडकमोल, जगदीश सपकाळे, चेतन नन्नवरे, विजयकुमार मौर्य, सुभाष सोनवणे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
