परतवाडा परिसरात संतापजनक प्रकार; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची जलद कारवाई
साईमत / अमरावती
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणाने संबंधित वृद्ध महिलेला “रुग्णालयात सोडतो” असे सांगून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातील पुलाखाली संधी साधून त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने धाडस दाखवत शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला.
अत्यंत वेगाने कारवाई करत पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
