साईमत / विरुधुनगर
तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी परिसरात असलेल्या एका फटाका निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, अजूनही अनेक कामगार मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्फोट इतका तीव्र होता की काही क्षणांतच आगीने शेजारील चार फटाका युनिट्सनाही वेढले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटाच्या धक्क्याने आसपासच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, मलबा हटवण्याचे आणि बचावकार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसराला पूर्णपणे वेढा घालण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार फटाके तयार करताना सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत प्रशासनाला तातडीने मदतकार्य वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
