साईमत / नागपूर
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात सकाळच्या सुमारास घडलेल्या गॅस सिलिंडर स्फोटाच्या भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पानतावणे यांच्या पत्नी स्वयंपाकघरात चहा तयार करत असताना अचानक गॅस गळती झाली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि त्यानंतर गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.
घटनेत घरातील सर्व साहित्य—जीवनावश्यक वस्तू, कपडे, टीव्ही, फ्रीज तसेच सोन्याचे दागिने—जळून खाक झाले असून सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुदैवाने, अतुल पानतावणे यांच्या पत्नी व मुलांना वेळेत घराबाहेर पडण्यात यश आले. मात्र अतुल हे बेडरूममध्ये अडकून पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह काही नागरिकांनी प्रयत्न केले. या प्रयत्नात काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान, या प्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
