साईमत / मेहकर
समृद्धी महामार्गावर चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि मोबाईलवर रील बनवण्याच्या व्यसनामुळे एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ घडली.
नेमकी घटना काय घडली : मुंबईहून पुसदकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना मेहकर टोल नाक्याजवळ आली. याचवेळी बसमधील चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
या निष्काळजीपणामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट समोर असलेल्या एका कारला जोरदार धडकली. या धडकेत कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
रुग्णालयात गोंधळ; डॉक्टर अनुपस्थित असल्याचा आरोप : जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात सुमारे एक तास कोणताही डॉक्टर उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा आक्रोश व्यक्त केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे चित्र दिसून आले.
गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
संतापाची लाट : या अपघातानंतर सोशल मीडियावर आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रील बनवण्याच्या नादात प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालक-वाहकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
