किसान क्रेडिट कार्डमुळे ‘शून्य व्याज’ कर्जाची संधी
साईमत पुणे प्रतिनिधी
राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन तसेच वराहपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनाच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, दूध संस्थेची हमी असल्यास ही कर्जमर्यादा तब्बल ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद आहे. याशिवाय, आधीपासून KCC धारक असलेल्या पशुपालकांना त्यांच्या पतमर्यादेत वाढ करून घेण्याचीही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कर्जावरील मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ टक्के आणि राज्य शासनाकडून ४ टक्के अशी एकूण ७ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. त्यातच बँकांकडून २ टक्क्यांची अतिरिक्त सवलत दिली जात असल्याने, नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होते.
सन २०२६-२७ पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गतही या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार असून, राज्यातील सुमारे १० लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने इतर कोणत्याही शासकीय अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच पशुधनाची नोंद एनडीएलएम (भारत पशुधन पोर्टल) वर असणे आवश्यक आहे. ठरावीक मर्यादेपर्यंत पशुधन असणे व घेतलेल्या कर्जाची परतफेड एका वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे.
दूध सोसायटी, दूध उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थांचे सदस्य असलेले आणि अद्याप या योजनेचा लाभ न घेतलेले पशुपालक या मोहिमेसाठी पात्र ठरतात. अधिक माहितीसाठी संबंधितांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा १९६२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पशुधनाच्या संगोपनासाठी आर्थिक अडचणी दूर करून ग्रामीण भागातील पशुधन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने अधिकाधिक पात्र पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
