साईमत प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर घडलेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना शेळके यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरखाली घुसली आणि वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत शेळके यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या पत्नीला अपघातानंतर बराच वेळ गाडीत अडकून राहावे लागले. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून त्यांना बाहेर काढले असून, दोघांवरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जितेंद्र शेळके हे भोंदू बाबा अशोक खरात यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. ते ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याशिवाय, त्यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातला अटक झाल्यानंतर शेळके मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
