साईमत प्रतिनिधी
राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. आगामी चार दिवस राज्यासाठी ‘धोक्याचे’ ठरणार असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या तापमानामुळे प्रशासनाने नागरिकांना “गरज असेल तरच घराबाहेर पडा,” असे कळकळीचे आवाहन केले आहे.
विदर्भ-मराठवाड्यात पारा ४४ अंशांच्या पार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्याच्या काही भागांत तापमानाचा पारा ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला या उष्णतेचा मोठा फटका बसणार आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान जास्त नसले तरी, हवामानातील दमटपणामुळे (Humidity) उकाडा असह्य होणार आहे.
वर्धा जिल्ह्यात शाळांना सुट्टी
वर्धा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून तापमान ४३ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी, १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
पाऊस आणि उष्णतेचा ‘डबल’ फटका
एकूणच राज्यात उन्हाचा तडाखा असतानाच, १८ आणि १९ एप्रिल रोजी राज्याच्या काही भागांत पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विचित्र हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाकडून ‘या’ सूचनांचे पालन करण्याचे आवाहन:
-
दुपारी १२ ते ४ टाळा: कडक उन्हामुळे या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
-
पाण्याचे प्रमाण वाढवा: शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्या.
-
आहाराची काळजी: हलके सुती कपडे वापरा आणि उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
-
आरोग्य यंत्रणा सज्ज: उष्माघाताचा (Heatstroke) धोका लक्षात घेता राज्य सरकारने सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे.
