साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील अयोध्या नगर येथे रविवारी सकाळी अचानक इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर आणि तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजून ४० मिनिटांनी स्थानिक नागरिक विजय वानखेडे यांनी मोबाईलद्वारे अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचेपर्यंत डीपीला लागलेली आग वाढत असल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या पथकाने प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या मोहिमेत वाहनचालक प्रकाश चव्हाण, प्रदीप धनगर, संजय तायडे तसेच फायरमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे विझवली. त्यांच्या तत्परतेमुळे आग इतर भागात पसरली नाही आणि मोठा धोका टळला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संबंधित इलेक्ट्रिक डीपीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
