शिवतीर्थ ते आकाशवाणी चौक मार्गावर झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंगचे काम युद्धपातळीवर सुरू नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहराला अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुशोभित बनवण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. मुख्य रस्त्यांवर पांढरे आणि पिवळे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग) टाकण्याच्या कामाला रविवार, १२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सुरुवात करण्यात आली.
या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसूत्र आणि सुरक्षित होणार असून, पहिल्याच टप्प्यात शिवतीर्थ चौक ते आकाशवाणी चौक या प्रमुख मार्गावर मार्किंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेत वाहतूक तुलनेने कमी असल्याने कामाचा वेग वाढविण्यात आला आणि सोमवारी सकाळपर्यंत या मार्गाचे संपूर्ण रूपच पालटलेले दिसून आले.
या कामाची प्रत्यक्ष पाहणी स्वतः महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी रात्री उशिरा केली. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदार व कामगारांशी संवाद साधून कामाची गुणवत्ता आणि गती याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाढती वाहतूक, अपघातांची वाढती शक्यता आणि रस्त्यांवरील अराजकता लक्षात घेता, रस्ते मार्किंगची मागणी सातत्याने पुढे येत होती. या पार्श्वभूमीवर महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावला.
या उपक्रमामुळे वाहनचालकांना त्यांच्या लेनची स्पष्ट कल्पना मिळणार असून, अपघातांची शक्यता कमी होऊन वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे. तसेच शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
दरम्यान, या उपक्रमाचे जळगावकर नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. प्रशासकीय पातळीवर केवळ निर्णय न घेता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेतल्याबद्दल महापौर दीपमाला काळे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. शहराच्या विकासासाठी घेतलेला हा पुढाकार भविष्यातील इतर प्रकल्पांसाठीही दिशादर्शक ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
