महापुरुषांच्या कार्याची उजळणी नव्या पिढीला दिला संदेश
साईमत जळगाव प्रतिनिधी
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी पंच मंडळाच्या वतीने संयुक्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.
यावेळी महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता, शिक्षण आणि स्वराज्याचा संदेश देणाऱ्या या दोन महान विभूतींच्या कार्याची उपस्थितांनी यावेळी उजळणी केली. त्यांच्या विचारांमुळे समाजाला दिशा मिळाली असून आजच्या पिढीने त्यांचे आदर्श आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच नगरसेवक नरेंद्र पाटील, अतुल बारी, सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक विजय पाटील, चंद्रकांत कोळी तसेच संत सावता माळी पंच मंडळाचे अध्यक्ष दिनेश महाजन, ईश्वर माळी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत अभिवादन करत सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप माळी यांनी केले. यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात समता, बंधुता आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.
