हॉटेल सायलीजवळ टोळक्याचा हल्ला; वाहन फोडून सपकाळेंना मारहाण
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बॅनरच्या किरकोळ वादातून थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत मजल गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी उघडकीस आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद सपकाळे हे दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप येथून रिंग रोडमार्गे बहिणाबाई उद्यान चौकाच्या दिशेने आपल्या चारचाकी वाहनाने जात होते. याच दरम्यान, हॉटेल सायली परिसरात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांच्या टोळक्याने त्यांचा मार्ग अडवला. बॅनर छपाईच्या वादातून निर्माण झालेल्या वैमनस्याने अचानक उग्र रूप धारण केले.
विशाल अहिरे या संशयिताने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केल्याचा आरोप सपकाळे यांनी केला आहे. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या तसेच धारदार शस्त्रांचा वापर करत सपकाळे यांच्या वाहनावर जोरदार हल्ला चढवला. वाहनाच्या सर्व बाजूंनी काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले.
वाहनाची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोरांनी थेट सपकाळे यांनाच लक्ष्य केले. या मारहाणीत ते जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या आरडाओरडीनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची वाढती गर्दी पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
जखमी अवस्थेत असलेल्या मुकुंद सपकाळे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
