पहिल्याच दिवशी सर्व विभागांना भेटी देत कामकाजाचा सखोल आढावा
साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारताच कामकाजात वेग आणण्याचा स्पष्ट संदेश दिला. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी देत सखोल आढावा घेतल्याने जिल्हा परिषद प्रशासनात ‘ॲक्शन मोड’ची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते करिश्मा नायर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न लावता कामकाजाला सुरुवात केली. प्रशासनाच्या विविध घटकांची माहिती घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही इमारतीतील सर्व विभागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. प्रत्येक टेबलवर जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. प्रलंबित कामे, अडचणी आणि प्राधान्याच्या योजना याबाबत माहिती घेत त्यांनी आवश्यक ते मार्गदर्शनही केले.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. नव्या सीईओंच्या कार्यतत्परतेमुळे कर्मचारीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करिश्मा नायर यांच्या सकारात्मक आणि वेगवान कामकाजाच्या शैलीमुळे जिल्हा परिषदेच्या विविध योजना आणि विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
