महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर महापालिकेची आक्रमक कारवाई; प्रमुख भागांत कचरा हटवून परिसर चकाचक
साईमत जळगाव प्रतिनिधी
‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्षात उतरवण्याचा ठोस निर्धार जळगाव महानगरपालिकेने केला असून, शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमेचा धडाका सुरू झाला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या स्पष्ट आणि कडक निर्देशानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांत स्वच्छतेची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागांतून साचलेला कचरा, अस्वच्छता आणि दुर्गंधी याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौरांनी आरोग्य विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने मेहरूण परिसरासह शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवली.
या मोहिमेअंतर्गत मेहरूण येथील स्मशानभूमी परिसरातील साचलेली घाण, वाढलेले गवत आणि कचरा पूर्णपणे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच शहरातील अत्यंत वर्दळीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात साचलेला कचरा हटवून परिसर चकाचक करण्यात आला आहे. याशिवाय दाणा बाजार परिसरातील जनता बँकेच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या कचरा डेपोची सफाई करून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामुळे परिसरातील दुर्गंधी कमी होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही दिलासा मिळाला आहे.
महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच दीपमाला काळे यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, त्यांच्या आक्रमक आणि परिणामकारक भूमिकेमुळे स्वच्छता कामांना अपेक्षित वेग मिळाला आहे. शहरातील साचलेल्या कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, ‘स्वच्छ जळगाव’ या संकल्पनेला आता प्रत्यक्ष आकार येताना दिसत आहे.
