मंजुषा हाउसिंग सोसायटीत चोरीची घटना; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भागात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंजुषा हाउसिंग सोसायटी परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी प्रमोद नामदेव अटाळे (वय ५४, रा. नंदनवन कॉलनी, गणेश कॉलनी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वहिनी वंदना या मंजुषा हाउसिंग सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्या दि. २५ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत घराबाहेर असल्याने घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच तांब्याची भांडी असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी, ४ एप्रिल रोजी सकाळी ही बाब उघडकीस आली, तेव्हा परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करत असून, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
