“फोन आला म्हणून कोणी गुन्हेगार नाही” – महाजनांचा उघड आव्हान
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच संजय राऊत, एकनाथ खडसे आणि इतर राजकीय नेत्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. महाजन म्हणाले, “संजय राऊतांनी माझ्याबद्दल एवढा पुळका का केला, ते मला कळत नाही. मी राज्यातच आहे, नाशिक किंवा जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेटतो आहे, बोलतो आहे.”
महाजनांनी राऊत यांना सल्ला दिला की, “तुमचे संपर्कातील आमदार जास्तीत जास्त सांभाळून ठेवा. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील, याकडे लक्ष द्यावे. तुमचा पक्ष सांभाळून ठेवा, आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय कसा मिळेल याकडे विचार करा.”
त्यांनी या विधानात स्पष्ट केले की, “आम्ही आमचे लोक परत घेणार नाही; पण तुम्ही तुमची मुट्ठीभर लोक सांभाळून ठेवा. दादा गट, शिंदे गटाकडून कोण आमच्याकडे येतो आहे, या राऊतांच्या गोष्टींनी लोक कंटाळले आहेत.”
एकनाथ खडसे आणि जमीन प्रकरणांवर खुलासा
महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे नाव घेत तक्रारींवर थेट प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “तुमची प्रत्येक आठवड्याला एसआरडी चौकशी होते, गुन्हे दाखल होत आहेत, लोकांच्या जमिनी खाल्ल्या जात आहेत, हायवेमध्ये जमीन घेतात आणि त्यांचे कार्यकर्ते लगेच झाडे लावतात. 136 कोटींच्या रॉयल्टीमध्ये दंड झाला आहे. मला माझ्या विषयी काही शंका असल्यास तक्रार करा.”
महाजनांनी आपल्या बाजूने स्पष्ट केले की, “महार वतनाची जमीन परत केली आहे, खरेदीचे पैसे घेतलेले नाहीत. तुमची जी जमीन मुलीच्या नावावर आहे ती का परत करत नाही?” त्यांनी पत्रकारांना आव्हान दिले की, “आपल्या एवढ्या बातम्या येत आहेत; तुम्हाला थोडेफार काही वाटते का? जमीन धरून बसल्यास काय साध्य होईल?”
एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांचे कॉल प्रकरण
महाजन म्हणाले, “एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांचे खरात यांच्यासोबत कॉल याबद्दल मला काही माहिती नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे, चौकशीत काय सत्य आहे ते बाहेर येईल. फोन आले किंवा फोन केले म्हणून कोणी गुन्हेगार आहे असे मी समजत नाही. अंजलीताई म्हणत असल्यास, चौकशी सुरू आहे आणि सत्य बाहेर येईलच.”महाजनांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद आणि चर्चेला बळ मिळाले आहे.
