चोपडा तालुक्यात हृदयद्रावक घटना; दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू
साईमत / जळगाव / प्रतिनिधी:
जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे गावात अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली असून, दोन महिन्यांच्या चिमुकलीचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मामलदे गावाजवळील शेतात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात दोन महिन्यांपूर्वी मुलीचा जन्म झाला होता. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच या घटनेने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेच्या रात्री चिमुकली आईच्या कुशीत झोपलेली असताना अज्ञात हिंस्त्र प्राण्याने तिला उचलून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सकाळी मुलगी आईजवळ न आढळल्याने कुटुंबीयांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. शोध घेतल्यानंतर शेताजवळ काही अंतरावर चिमुकलीचे अवशेष आढळून आले.
या प्रकरणी नेमका कोणता प्राणी जबाबदार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरात वारंवार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे. विशेषतः बिबट्याच्या हालचालींबाबत पूर्वीपासून तक्रारी करण्यात येत असतानाही प्रभावी उपाययोजना न केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
