प्रेस फोटोग्राफर संघाचे कप्तान भूषण हंसकर मिळाले मालिकावीर पुरस्कार
साईमत जळगाव प्रतिनिधी:
पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रीमियर लीग’ पर्व-२ चा समारोप २९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारली, तर प्रेस एडिटर संघाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व संघांना आणि खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
पत्रकारांचा उत्साह आणि मेहनत
समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांनी, ऊन, वारा, पाऊस आणि थंडी सहन करत, दिन-रात्र धावपळ करत ही स्पर्धा साजरी केली. राज्यात अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी विविध खेळ स्पर्धा आयोजित केल्या तरी पत्रकारांसाठी असा उत्सव खूप महत्त्वाचा ठरतो. पत्रकारांच्या आरोग्य आणि मनोरंजनासाठी आयोजित पत्रकार प्रीमियर लीगचे दुसरे पर्व २६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदान येथे पार पडले.
२४ संघांचा सहभाग, चुरशीचे सामने
जिल्ह्यातील पत्रकार संघटनांच्या पाठींब्याने आयोजित झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील तालुकानिहाय १४ संघ, जळगाव शहरातील संघ, संपादक संघ, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, डॉक्टर, पोलीस प्रशासन संघ यासह २४ संघ सहभागी झाले. चार दिवसात अनेक चुरशीचे सामने रंगले. ६ षटकांच्या सामन्यात ९९ सर्वोच्च धावसंख्या तर २० सर्वात कमी धावसंख्या प्रेक्षकांनी अनुभवली.
खेळाडू, प्रेक्षक व कुटुंबासाठी उत्तम व्यवस्था
चार दिवसीय स्पर्धेत जवळपास ५०० पेक्षा अधिक पत्रकारांनी सहभाग नोंदवला. खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खेळाडू, कुटुंबीय आणि प्रेक्षकांसाठी सरबत, पाणी आणि लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा देखील आयोजकांनी पुरवली. स्पर्धेसाठी किशोर पाटील, वाल्मिक जोशी, प्रवीण सपकाळे, चेतन वाणी, जकी अहमद, भगवान सोनार, वसीम खान, सचिन गोसावी, राकेश वाणी, यामिनी कुलकर्णी यांसह अनेक पत्रकार मित्रांनी परिश्रम घेतले.
मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप
स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत टॉससाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे, आमदार किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, धरणगाव नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील, जिल्हा दूध संघ संचालिका भैरवी वाघ-पलांडे, जिल्हाधिकारी डॉ.रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रांताधिकारी विनय गोसावी, उद्योजिका शीतल बाक्षे, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर यांसह जेष्ठ पत्रकार उपस्थित होते.
मुख्य चषक आणि सन्मानचिन्ह
उपउपांत्य फेरीत गतविजेता चाळीसगाव संघ, जळगाव प्रिंट मीडिया, जळगाव एडिटर आणि प्रेस फोटोग्राफर संघ पोहचले होते. अंतीम सामना जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळला गेला, जिथे प्रेस फोटोग्राफर संघ विजेता ठरला. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने मिळवला. प्रत्येक सामन्यातील सलामीवीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, मालिकावीर यांसह विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
मैत्रीपूर्ण सामन्यांनी वाढवली रंगत
शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी संघ विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय संघ असा सामना रंगला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय संघ सामन्यात पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात विजय मिळाला. संपन्न लीगमध्ये उत्कृष्ट खेळासाठी मालिकावीरचा पुरस्कार प्रेस फोटोग्राफर संघाचे कप्तान भूषण हंसकर यांना जिल्हाधिकारी डॉ. रोहन घुगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ने पत्रकारांना खेळ, मनोरंजन, मैत्री आणि स्पर्धात्मक भावना यांचा अनुभव दिला असून, हे आयोजन पत्रकार समुदायासाठी एक उत्साहवर्धक आणि संस्मरणीय क्षण ठरले.
