३१ मार्च अंतिम मुदत; ७९ बड्या थकबाकीदारांची यादी जाहीर, १ एप्रिलपासून जप्ती कारवाई सुरू
साईमत जळगाव प्रतिनिधी:
मालमत्ता कर वसुलीसाठी जळगाव महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. थकीत करावरील दंडमाफी योजनेची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना महापालिकेने तब्बल ७९ मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे. संबंधितांनी ३१ मार्चपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास १ एप्रिलपासून त्यांच्या मालमत्तांना थेट टाळे ठोकून जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या कर संकलन विभागाने गेल्या काही दिवसांत विशेष मोहीम राबवत आतापर्यंत ७८ कोटी रुपयांची वसुली केली आहे. मात्र, अद्यापही अनेक मोठे थकबाकीदार कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
जाहीर करण्यात आलेल्या यादीत केवळ खासगी व्यक्तींचाच नव्हे, तर शहरातील प्रतिष्ठित सामाजिक संस्थांच्या कार्यालयांचा व सभागृहांचाही समावेश आहे. यात क्षत्रिय मराठा समाज सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, वैश्यवाणी समाज मंदिर, जळगाव जिल्हा सेवा समिती, नाभिक समाज जिल्हा ट्रस्ट यांसह एमआयडीसी परिसरातील काही नामांकित प्लास्टिक उद्योग, पेपर मिल्स, अॅग्रो उद्योग, तसेच काही राजकीय नेत्यांची कार्यालये व खासगी दुकानेही आहेत.
दरम्यान, करदात्यांनी शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी रविवार आणि सोमवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवलेल्या कर भरणा केंद्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील दोन दिवसांत कर भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
