लाकडी दांडक्याने १९ वर्षीय तरुणावर मारहाण तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत जळगाव प्रतिनिधी :
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात चोरीच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. ही धक्कादायक घटना २४ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानिया पार्क परिसरातील रहिवासी हम्मिद अब्बास खाटीक (वय ४९) यांचा मुलगा अबरार उर्फ चिरक्या (वय १९) या रात्री पिंप्राळा हुडको भागात संशयित आरोपी पंकज, सुपड्या (पूर्ण नाव माहित नाही) आणि किरण अशोक सपकाळे यांनी अडकवला. त्यानंतर त्यांनी अबरारवर शिवीगाळ करत दमदाटी केली आणि हातातील लाकडी दांडक्याने तसेच लोखंडी सळईने त्याला भयानक मारहाण केली. या हल्ल्यात अबरार गंभीर जखमी झाला.
अबरारचे वडील हम्मिद खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी आरोपी सुपड्या, पंकज आणि किरण अशोक सपकाळे (सर्व रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ भिका खाटीक करत आहेत.
पोलीसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली असून, अशा प्रकारच्या हिंसक घटनांमध्ये तातडीने माहिती पोलीसांना देण्याचे आवाहन केले आहे.
