खुनातील आरोपी पकडला; १.१५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपीला त्याच्या साथीदारासह जिल्हापेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील संभाव्य गुन्हेगारी कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ६० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुले आणि ४० हजार रुपये किमतीच्या ८ तलवारी असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी धनंजय उर्फ धिरज दत्तू कोळी (वय २०, रा. पाळधी) हा जळगाव शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पथक तयार करून आर.आर. शाळा परिसरात सापळा रचला.
पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाली आढळल्याने धनंजय कोळी आणि त्याचा साथीदार अजय मारुती डोळे (वय २३, रा. नेरी दिगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या मोटारसायकलची (MH19 AZ 2412) झडती घेतली असता, गाडीला बांधलेल्या पिशवीत एक तलवार आणि पेट्रोल टाकीखाली इंजिनजवळ लपवलेले गावठी पिस्तुल आढळून आले.
पुढील तपासात आरोपी धनंजय कोळी याच्यावर यापूर्वीही धरणगाव व रामानंद नगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.
या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
