साईमत जळगाव प्रतिनिधी :
जळगाव महानगरपालिकेतर्फे महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित ‘कार्यक्षमता वृद्धी’ कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत अर्थतज्ञ, लेखक आणि महाराष्ट्र नीती आयोगाचे सदस्य दीपक करंजीकर यांनी नगरसेवकांना तंत्रज्ञानाचा उपयोग, अभ्यासाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि कृतीशील कामातून शहरातील प्रभावी नेतृत्व कसे घडवता येईल यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेते नितीन लढ्ढा होते. मंचावर महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, अतिरिक्त आयुक्त शोभाताई बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, तसेच वित्त व लेखा अधिकारी विजयकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. महापौर काळे यांनी प्रास्ताविकात सांगितले, “एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून घडण्यासाठी सातत्याने प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे.”
वक्ते दीपक करंजीकर यांनी नगरसेवकांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मोलाचे सल्ले दिले. त्यांनी सांगितले की, “नगरसेवक म्हणून कामकाजाची माहिती मिळवण्यासाठी दररोज अपडेट राहणे गरजेचे आहे. डिजिटल युगात तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. पुढील १०० दिवसांत कोणत्याही पाच महत्त्वाच्या कामांची निवड करून ती पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करा.”
करंजीकर यांनी शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची ‘डेटा बँक’ तयार करण्याचे महत्व सांगितले, ज्याचा उपयोग शहराच्या विकासासाठी करता येईल. तसेच महापालिकेच्या ग्रंथालयातील ५८ हजार पुस्तके जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले, “शहर शिस्तबद्ध करायचे असल्यास आधी स्वतःला शिस्तीत आणा आणि आपले ‘डॉक्युमेंटेशन’ पक्के ठेवा.”
अध्यक्षीय भाषणात नितीन लढ्ढा यांनी नमूद केले की, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांचा स्वतःचा अभ्यास आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन आवश्यक आहे. अभ्यासू व्यक्तिमत्वच सभागृहात आणि प्रशासनात प्रभावी छाप पाडते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका ॲड. सुचिता हाडा यांनी केले, परिचय नगरसेविका सुरेखा तायडे, तर आभार मानले नगरसेविका गायत्री राणे यांनी. या कार्यशाळेत एकूण ४५ नगरसेवकांनी उपस्थिती लावली. आयोजकांच्या माहितीनुसार, प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पुढील १०० दिवसांत दीपक करंजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आयोजित केला जाणार आहे.
