३२ बॅनर हटवले आणि गाड्या जप्त रिंग रोड व आंबेडकर उद्यान परिसरात विशेष मोहीम
साईमत / जळगाव / प्रतिनिधी –
शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेने सोमवारी (दि. २३ मार्च) मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. शहरातील विविध भागांत राबविलेल्या या विशेष मोहिमेत अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासोबतच बेकायदेशीर बॅनर काढण्यात आले, तर काही गाड्या आणि काऊंटरही जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या वतीने ह्या कारवाईत रिंग रोड परिसर, आंबेडकर उद्यान परिसर, कन्या शाळा परिसर आणि मुलींची आयटीआय परिसर यांचा समावेश होता. या ठिकाणी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या आणि एक अनधिकृत काऊंटर जप्त करण्यात आला, ज्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा कमी झाला.
याशिवाय, शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले एकूण ३२ छोटे-मोठे बॅनरही हटवण्यात आले. परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत होता आणि नागरिकांमध्ये त्रास होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. इच्छादेवी रोड, महाबळ रोड आणि रिंग रोड परिसरातही अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवण्यात आली.
महापालिकेच्या या कारवाईमुळे रस्ते मोकळे होऊन नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अतिक्रमणामुळे वाढणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता ही मोहिम महत्त्वाची ठरली आहे. संपूर्ण कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.
महापालिकेने संकेत दिले आहेत की, आगामी काळातही अशा मोहिमांचा सातत्याने अवलंब केला जाईल आणि नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
