साईमत / नवी दिल्ली / प्रतिनिधी
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महत्त्वाचे भाषण करत भारताची भूमिका स्पष्ट केली. गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परदेशातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनीत कोणताही अडथळा निर्माण होणे भारताला मान्य नाही. देशातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, गॅस आणि खतांची आयात या मार्गावर अवलंबून असल्याने या मार्गातील अडथळ्यांचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे भारताने विविध देशांशी सातत्याने संपर्क ठेवत पर्यायी पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. यासाठी आयात करणाऱ्या देशांची संख्या २७ वरून ४१ पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे ५.३ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक धोरणात्मक पेट्रोलियम साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तात्पुरत्या अडचणींवर मात करण्याची क्षमता देशात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, आयात-निर्यात, पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने विशेष गट स्थापन केला असून तो दररोज परिस्थितीचा आढावा घेत आहे.
पश्चिम आशियातील विविध देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय कार्यरत असल्याने त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ३ लाख ७५ हजार भारतीयांना सुरक्षितपणे देशात परत आणण्यात यश आल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. तसेच अडकलेल्या नागरिकांसाठी २४x७ हेल्पलाइन आणि विशेष बचाव मोहिमा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
देशांतर्गत परिस्थितीवरही सरकार बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला. राज्य सरकारांनाही आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी होत असताना पंतप्रधानांनी सरकारची तयारी आणि उपाययोजना मांडल्या. पेट्रोलियम, वीज, खत आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवले जात असून, जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत संयम, कूटनीती आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
