साईमत / नागपूर / प्रतिनिधी
राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवहन मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात ३ हजार आत्याधुनिक स्मार्ट बसची भर घालण्यात येत आहे. या नवीन बसचे उद्घाटन २४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बस प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणार आहेत. या बसमध्ये ३×२ आसनरचना असून एकूण ५६ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या बसच्या तुलनेत १६ अतिरिक्त आसने उपलब्ध असणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली, पॅनिक बटण, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांसारख्या आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
या बस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यान चालवण्यात येणार असून गर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी त्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
या नवीन बस सर्वप्रथम नागपूर येथे दाखल होणार असून प्रारंभी ५० बस रस्त्यावर उतरवण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर भागातही या सेवा सुरू केल्या जाणार आहेत.
दरम्यान, या बसला ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याचा उद्देश आहे. याआधी एसटी महामंडळाने ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशी नावे दिली असून त्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ची भर पडली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करण्यात आले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
